शाहूवाडीत निराधार, वंचित मुलांचा जयश्री ठरल्या आधारवड
महिला दिन विशेष
विशाळगड : पुढारी वृत्तसेवा

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अनेक महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव होत असताना, चनवाड येथील देवघर सेवाधाम संस्थेच्या संस्थापिका जयश्री दीपक बुचडे या महिलेची कहाणी सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरत आहे. स्वतःची परिस्थिती जेमतेम असतानाही जयश्री बुचडे यांनी आपले संपूर्ण आयुष्य अनाथ मुलांच्या सेवेसाठी समर्पित केले आहे.
चनवाड येथे देवघर सेवाधाम आश्रम शाळा आहे. या संस्थेची स्थापना एका निवृत्त सेवापुरवठा अधिकारी कै. बाबासो मिसाळ यांनी सन २००६ मध्ये केली. त्यांच्या पश्चात या संस्थेचा सर्व कारभार त्यांची कन्या सौ. जयश्री बुचडे व जावई दीपक बुचडे हे सांभाळत आहेत. ही सेवा संस्था वंचित, अनाथ, निराधार मुलांची आधारवड आहे. या संस्थेच्या
संस्थापिका जयश्रीताई आहेत. देवघरमध्ये ७ ते १३ वयोगटातील ४२ हून अधिक मुले व मुली आहेत. ही मुले अनाथ, वंचित घटकातील असून, कुणाला आई, तर कुणाला बाप नाही, तर काही अनाथ आहेत, अशी विदारक परिस्थितीतील आहेत. या सेवा संस्थेला शासनाचे कोणतेही अनुदान मिळत नाही. मुलांच्या शिक्षणाबरोबर खाण्या-पिण्याचे, आरोग्याचे हाल होऊ नयेत, म्हणून समाजातील
दातृत्वाकडे पदर पसरून त्यांच्या जेवणाची, राहण्याची आणि शिक्षणाची दारे खुली करून स्वतः जेवण बनवून त्यांना सांभाळत आहेत. त्यांना त्यांचे पती दीपक बुचडे, मुलगा जगदिश, मुलगी सानिया सहकार्य करत आहेत. जगदीश उत्तम तबला वादक असून, सानिया उत्तम गायिका आहे. त्यांच्या अभंगनाद कार्यक्रमातून तेही संस्थेतील मुलांसाठी मदत करत आहेत. त्या अनाथ मुलांच्या आई आहेत.